“हा काही ढोल नाहीये,” सविता दास त्याकडे बोट दाखवून म्हणते – तो खरं तर ढोलच असतो.

आपल्यासमोर मोजकेच पर्याय असले तरी त्यात बंदिस्त न होता बिहारच्या पटणा जिल्ह्यातल्या धिबरा गावच्या बायांच्या या गटाने चरितार्थासाठी एक आगळा वेगळा पर्याय निवडायचं ठरवलं. लागवडीखालची जमीन आणि तसंही कमी मजुरी देणारी शेतमजुरी – दोन्ही घटत असताना त्यांनी हातात टिपरू घेतलं. सुरुवात सोळा जणींपासून झाली. पण घरच्यांचा दबाव आणि सततच्या टिकेच्या माऱ्यापुढे सहा जणी झुकल्या आणि त्यांनी माघार घेतली. ज्या दहा टिकून राहिल्या – त्या सगळ्यांचं आडनाव दास – त्यांनी २०१२ साली राज्यातला फक्त स्त्रियांचा असा पहिला बँड सुरू केला – सरगम महिला बँड.

व्हिडिओ पहाः बिहारच्या धिबरा गावचा फक्त महिला असणारा सरगम महिला बँड जोषात ढोल वाजवताना

“माझे हात बघा, रानातल्या कष्टाने आता त्याला घट्टे पडलेले नाहीत. आमच्याकडे आता पैसा आहे. आम्हाला मान आहे. अजून काय हवंय?” दोन मुलांची आई असलेली ३५ वर्षांची दोमिनी दास विचारते.

सविता आणि दोमिनीप्रमाणेच सरगम महिला बँडच्या इतर सदस्य – पंचम, अनिता, ललिता, मालती, सोना, बिजंती, चित्रेख, छतिया – सगळ्या महादलित आहेत. बिहारमध्ये अनुसूचित जातींमधला सर्वात गरीब आणि भेदभाव सहन करणारा जातीसमूह म्हणून महादलित समाज ओळखला जातो. राज्यातल्या एकूण १ कोटी ६५ लाख दलितांमधले एक तृतीयांश महादलित आहेत. महिला बँडमधल्या प्रत्येकीकडे त्यांच्या पूर्वजांचा वरच्या जातीच्या लोकांनी कसा अनन्वित छळ केला त्याच्या कहाण्या आहेत. त्यांच्या स्वतःच्या कहाण्याही आहेत – वरच्या जातीच्या जमिनदारांनी रानात काम करताना केलेल्या अत्याचारांच्या आणि घरात स्वतः नवऱ्यांनी. या सगळ्या जणी दानापूर तालुक्यातल्या जमसौत पंचायतीत येणाऱ्या धिबऱ्या गावच्या रहिवासी आहेत.


PHOTO • Puja Awasthi

‘ढोलावरची प्रत्येक थाप माझ्यासाठी आजवर मला ज्या ज्या गोष्टींनी रोखून धरलं त्याला दिलेला धक्का असते,’ बँडचं नेतृत्व करणारी सविता सांगते (डावीकडे, पुढे), उजवीकडेः सरगम महिला बँडचं कार्ड

पन्नास वर्षीय चित्रेख सांगते की तिचा नवरा दर वेळी तिला बाहेर जायचं असलं की तिला अडवायचा आणि हरकत घ्यायचा. “घरातली कामं कर – तो म्हणायचा. कधी कधी तर त्याच्या मर्जीने मला काहीही सांगायचा. पण आता  जेव्हा मी बाहेर जायला निघते, तेव्हा तोच मला घाई करत असतो, उशीर होईल म्हणून. सगळंच कसं बदललंय,” तिला हसू फुटतं.

ढोल वाजवावेत ही कल्पना काही फक्त त्यांच्या डोक्यातून आलेली नाही. त्या एका बचत गटाच्या सदस्य होत्या आणि त्य सांगतात त्याप्रमाणे, “त्यांना एकत्र काम करण्याची सवय होती.” अर्थार्जनासाठी पापड लोणची सोडून वेगळं काही तरी करण्याची त्यांची सगळ्यांचीच इच्छा होती. तेव्हाच पटण्याच्या नारी गुंजन या संस्थेने त्यांना बँडची कल्पना सुचवली आणि त्यांच्यासाठी एका संगीत शिक्षकाचीही सोय केली. मग काय त्यांनी ही कल्पना उचलूनच धरली. आदित्य कुमार गुंजन रोज पटण्याहून २० किलोमीटर प्रवास करून येत असत – आठवड्याचे सात दिवस, सलग दीड वर्षं.

PHOTO • Puja Awasthi

बँडच्या सदस्या ३० ते ५० वयोगटातल्या आहेत, त्यातल्या दोघी - पंचम (डावीकडे) आणि चित्रेख (उजवीकडे)

सुरुवातीचा काळ अवघड होता. गटातल्या सगळ्याच जणी ३० ते ५० वयोगटातल्या. गावकऱ्यांची सततची बोलणी होतीच – त्या आता पुरुषांसारखं बनू पाहतायत ही त्यातली सर्वात बोचरी टीका. त्यात हाताचे दुखरे तळवे आणि ढोलाचे पट्टे बांधल्याने आखडलेले खांदे. तेही सहन करावंच लागत होतं.

जसजसं या अनोख्या बँडचं नाव होऊ लागलं तसं स्थानिक कार्यक्रमांची निमंत्रणं येऊ लागली. तेव्हापासून त्यांनी फार मोठं अंतर पार केलं आहे. पटणा आणि आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तर त्यांनी वाजवलं आहेच पण या बँडचे ओदिशा आणि दिल्लीतही कार्यक्रम झाले आहेत. राजधानीतला अगदी पहिल्यांदा मेट्रोमधून फिरण्याचा अनुभव आणि तिथल्या आनंददायी आठवणी त्यांनी उराशी जपून ठेवल्या आहेत.

त्यांचा पैशाचा सगळा व्यवहार आणि कार्यक्रमांचं सगळं नियोजन त्या स्वतःच पाहतात. कमाई सगळ्यांमध्ये सारखी वाटून घेतली जाते आणि जी कुणी कार्यक्रमात येत नाही तिला पैसे दिले जात नाहीत. गावकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्या शेतात सराव करतात. जसे कार्यक्रम असतील त्याप्रमाणे किती सराव करायचा ते ठरतं. त्यांची कार्डं आहेत आणि वागणुकीचे काही नियम आहेत. सगळ्या व्यवस्थित पोषाख करतील आणि त्यांची बँडप्रमुख सविताच सगळ्या कार्यक्रमांची बोलणी करेल असं त्यात नमूद केलेलं आहे.

PHOTO • Puja Awasthi

या महिलांचं गाण्या-बजावण्याचं कौशल्य पाहून आता सगळ्या जातीची मंडळी त्यांना बोलावू लागली आहेत. इतकंच काय त्यांच्या उपलब्धतेनुसार कार्यक्रमांच्या तारखा ठरू लागल्या आहेत

एक अलिखित नियम असाही आहे की प्रत्येक बाई तिची कमाई स्वतःच सांभाळेल. “पती को नही देंगे,” त्या ठामपणे सांगतात. ३२ वर्षांची अनिता सांगते, “मी माझ्या मुलांच्या शाळेच्या फीसाठी आणि पुस्तकांसाठी हे पैसे खर्च करते. आमचं खाणं सुधारलंय. मी पैसे साठवून कधी कधी माझ्यासाठीच खर्च करते. जे स्वातंत्र्य मिळवण्यात अख्खी जिंदगी गेलीये ते असंच का सोडून द्यावं?”

परंपरेने चालत आलेली जातीची उतरंड पाहता खरं तर वरच्या जातीच्या लग्नांना किंवा सण समारंभांना या बँडच्या महिला नुसत्या उपस्थित असत्या तरी ‘विटाळ’ झाला असता. पण या बायांनी त्यांचं जे एक पर्यायी जग तयार केलं आहे त्यात मात्र या महिलांचं गाण्या-बजावण्याचं कौशल्य पाहून आता सगळ्या जातीची मंडळी त्यांना बोलावू लागली आहेत. इतकंच काय त्यांच्या उपलब्धतेनुसार कार्यक्रमांच्या तारखा ठरू लागल्या आहेत. ज्या हॉटेलकडे पाहण्याचीही आधी हिंमत केली नसेल त्या हॉटेलांमध्ये आता अगदी ताठ मानेने जात असल्याचं या सगळ्या जणी कौतुकाने सांगतात.

PHOTO • Puja Awasthi

त्यांच्या बँडचं नाव झाल्यामुळे अनिता (डावीकडे), छतिया (उजवीकडे) आणि बँडच्या इतर सदस्यांना अशा कार्यक्रमांची निमंत्रणं येत आहेत, जिथे त्यांना आधी प्रवेशही नव्हता.

एका दिवसासाठी सरगम महिला बँड १०,००० ते १५,००० रु. मानधन घेतो. लगीनसराईत त्यांना महिन्याला अगदी दहा आवतनं येतात. त्यामुळे अशा हंगामात त्यांची महिन्याला अगदी १.५ लाखापर्यंत कमाई होते. “आमचं पक्कं काही ठरलेलं नसतं, त्यामुळे कमी जास्त करता येतं,” सविता सांगते. पण काही अटी पाळाव्याच लागतात. गावातून घेऊन जाणं आणि परत आणून सोडणं, मुक्काम करावा लागणार असेल तर राहण्यासाठी नीट सोय.

त्यांना आधी जो रोजगार मिळायचा त्याच्या तुलनेत आज त्यांची परिस्थिती कशी आहे? बिहार हे असं राज्य आहे जिथे मनरेगाच्या कामावर १६८ रु. मजुरी मिळते. जेव्हा या बायांनी बँड सुरू केला तेव्हा इथे अकुशल कामगारांसाठी नियमानुसार किमान वेतन रु. २०० होतं. आणि तेही क्वचितच पाळलं जात असे. २०१२ मध्ये शेतमजुरीसाठी या बायांना दिवसाला १०० रुपयापेक्षा फार जास्त मजुरी दिली जात नव्हती.

आर्थिक स्वातंत्र्यामुळे गावामध्ये जरी त्यांना आता मान मिळू लागला असला (आणि त्यामुळे इतरही अनेक जणी बँडमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्या) तरी समाजाप्रती असलेलं देणं मात्र त्या विसरलेल्या नाहीत. अत्याचार करणारे नवरे, हुंडा मागणारी मंडळी – या सगळ्यांचा त्या मुकाबला करत आहेत आणि धिबरा आणि जवळपासच्या गावांसाठी त्या समुपदेशकाचं, मध्यस्थाचं काम करू लागल्या आहेत. त्यांनी कसा समझौता केला, कसा हस्तक्षेप केला याची अनेक त्या उदाहरणं सांगतात, अर्थात कुणाचीही नावं न घेता.


PHOTO • Puja Awasthi

बँडमध्ये सामील झाल्यापासून ललिता (उजवीकडे) आणि इतरही अनेकींनी फार कष्टाने स्वातंत्र्य आणि सन्मान मिळवला आहे

नजीकच्या काळात सध्याच्या नऊ ड्रम आणि एक खुळखळ्यासारख्या शेकरच्या जोडीला एक बास ड्रम आणि एक कॅसिओ कीबोर्ड घेण्याचं सरगम बँडने ठरवलं आहे. भांगडा ठेका त्यांचा सगळ्यात आवडता असला तरी आता त्या स्वतःच चाली लावू लागल्या आहेत, नवे ताल वाजवू लागल्या आहेत. त्यांना स्वतःचा एक गणवेशही हवा आहे – पँट आणि शर्ट, जोडीला टोपी आणि गळ्यात एका खांद्यावर अडकवायची पिशवी, ज्या ‘सैनिकी बँड’शी त्या आपल्या बँडची तुलना करतात अगदी त्यांच्यासारखीच.

इतर मैत्रिणींप्रमाणेच सविता मागे वळून पाहतो तेव्हा या सगळ्यावर तिचाच विश्वास बसत नाही. ढोल हे तिच्यासाठी फक्त एक वाद्य नाही. “ढोलावरची प्रत्येक थाप माझ्यासाठी आजवर मला ज्या ज्या गोष्टींनी रोखून धरलं त्याला दिलेला धक्का असते,” ती म्हणते.

जगाच्या या एका लहानशा कोपऱ्यात ढोलावरची सरगम बँडची एकेक थाप बदल घडवून आणत आहे.

अनुवादः मेधा काळे

Puja Awasthi

Puja Awasthi is a freelance print and online journalist, and an aspiring photographer based in Lucknow. She loves yoga, travelling and all things handmade.

Other stories by Puja Awasthi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale