जग सध्या एका कठीण काळातून जात आहे. आपल्‍यातल्‍याच काही जणांनी लागू केलेल्‍या लॉकडाऊनमुळे आपण सगळे आपल्‍या घरात बंद झालो होतो त्याच वेळी शेकडो, हजारो, लाखो लोक शेकडो मैल दूर असलेल्‍या त्‍यांच्‍या गावाकडे पायी निघतील, असं आपल्‍याला अजिबात वाटलं नव्‍हतं. या प्रकाराने मी खूप दुःखी झालो. आपल्‍या विकसित देशात, महान देशात, अनेक बाबतीत अग्रेसर होण्‍याचा दावा करणाऱ्या या देशात कोट्यवधी लोक केवळ आसर्‍यासाठी, आपल्‍या घरी पोचण्यासाठी शेकडो मैल चालत जातात, या गोष्टीने मी अस्‍वस्थ झालो.

‘घरात राहा’? किती लोकांकडे घर आहे इथे? शेकडो किलोमीटर चालता चालता त्‍यातल्‍या काहींचा मृत्‍यू झाला. ती पावलं, ती मुलं... त्‍यांची चित्रं पाहिली तेव्‍हा माझं दुःख व्‍यक्‍त करावंसं वाटलं मला. मला नाही वाटत हे आपल्‍याच देशापुरतं सीमित आहे. संपूर्ण जगच या संकटाचा सामना करतंय. अनेक जण फक्‍त कोरोनाचा विचार करत होते, इतर माणसं त्‍यांच्‍या खिजगणतीतही नव्‍हती... अशा वेळी दूरवर स्‍थलांतर करणार्‍या मजुरांचं दुःख मला मांडायचं होतं. या दुःखातूनच या गाण्‍याचा जन्‍म झाला आहे.

जग पाहू इच्‍छिणार्‍या, जगभर फिरण्‍याची आस असणार्‍या मनाचा मी प्रवासी आहे. माणसांबद्दल मला विलक्षण प्रेम आहे, त्‍यांची आयुष्‍यं मन:चक्षुंसमोर आणण्‍याचा मी प्रयत्‍न करत असतो. हे गीत या दोन्ही गोष्टींच्‍या मिलाफातून उतरलं आहे...

व्‍हिडिओ पहा : लॉकडाऊन स्‍थलांतरितांचा लाँग मार्च...

PHOTO • Nityanand Jayaraman
काय करत असतील घरी माझी पिल्‍लं... पोटभर मस्‍ती की उपवास?

काय करत असेल माझी म्‍हातारी? कसा भरवत असेल त्‍यांना घास?

जगण्‍यासाठी बाहेर पडलो
पोटासाठी कायम फिरावंच लागलं

हा देश असेल महान
आमचं जिणं मात्र हरामच राहिलं

आणि आता हा दुष्ट आजार
अवघं आयुष्य याने केलं बरबाद...
काय करत असेल माझी म्‍हातारी? कसा भरवत असेल माझ्‍या पिल्‍लांना घास?

हे आयुष्य? हे कसलं आयुष्‍य?
बिच्‍चारं... दयनीय... दरिद्री...
मोडलेलं... विखुरलेलं...

गरिबीपेक्षा वाईट कुठला आजार आहे?
आणि आपल्‍या माणसांमध्ये असण्‍यापेक्षा मोठं कोणतं सुख आहे?

या कठीण काळात पुरेसं आहे आपल्‍या घरी, आपल्‍या कुटुंबासोबत असणं
जे काही ओलं-कोरडं आहे ते खाऊन आपल्‍या माणसांसोबत जगणं

डोळ्‍यांसमोर येत राहातात सतत चेहरे माझ्‍या पिल्‍लांचे
आणि कानावर आदळत राहातात विलाप माझ्‍या बायकोचे

काय करायला हवंय मी? कसं करायला हवंय?
काय करू?... कसं करू?... काही सुचेना झालंय

बस नको मला, सारू... नको ट्रेन स्‍पेशल
मला फक्त जाऊ द्या, साहेब, जाईन करीत मजल-दरमजल

बस नको मला, सारू... नको ट्रेन स्‍पेशल
मला फक्त जाऊ द्या, साहेब, करीत मजल-दरमजल

काय करत असतील घरी माझी पिल्‍लं... पोटभर मस्‍ती की उपवास?
काय करत असेल माझी म्‍हातारी? कसा भरवत असेल त्‍यांना घास?

काय करत असतील घरी माझी पिल्‍लं... पोटभर मस्‍ती की उपवास?
काय करत असेल माझी म्‍हातारी? कसा भरवत असेल त्‍यांना घास?

मला जाऊ दे सारू, घरापर्यंत जाईन मी पायी
मला जाऊ द्या साहेब, घरी जाईन मी पायीपायी

गीतकार, संगीतकार आणि गायक : आदेश रवी

मूळ तेलगू गीताचा अनुवाद : कुमार नरसिंहा आणि किन्‍नेरा मूर्ती

आदेश रवी यांच्‍या मूळ तेलगू लेखाचा अनुवाद : राहुल एम.

मराठी अनुवादः वैशाली रोडे

Aadesh Ravi

Aadesh Ravi is a Hyderabad-based composer, lyric writer, singer in the Telugu film industry

Other stories by Aadesh Ravi
Translator : Vaishali Rode

Vaishali Rode is an independent journalist and a writer with prior experience in Marathi print media. She has penned the autobiography of a transgender, MI HIJDA MI LAXMI, which has been translated in many languages.

Other stories by Vaishali Rode