आम्हाला उशीर झाला होता. “गणपती बाळा यादव तुम्ही आलात का नाही ते पहायला दोनदा त्यांच्या गावाहून चकरा मारून गेलेत,” शिरगावचे आमचे पत्रकार मित्र संपत मोरे सांगत होते. दोन्ही वेळा ते त्यांच्या गावी रामापूरला परत गेले. आता तुम्ही आला आहात असं त्यांना सांगू तेव्हा ते तिसऱ्या खेपेला इथे येतील. या दोन्ही गावात ५ किलोमीटरचं अंतर आहे आणि गणपती यादव हे अंतर सायकलने कापतात. आणि मे महिन्याच्या उन्हाच्या कारात अशा तीन खेपा म्हणजे ३० किलोमीटर, तेही डर्ट ट्रॅकला लाजवेल अशा ‘रस्त्या’वर, सायकल किमान पाव शतकापूर्वीची. आणि सायकलस्वाराचं वय, ९७ वर्षे.
सांगलीच्या कडेगाव तालुक्यातल्या शिरगावात मोरेंच्या आजोबांच्या घरी आम्ही
जेवायला बसतच होतो तितक्यात गणपती बाळा यादव निवांत त्यांच्या सायकलवर तिथे पोचले.
इतक्या उन्हाचं त्यांना एवढं अंतर कापत इथे यायला लागलं म्हणून मी त्यांची
पुन्हापुन्हा माफी मागत होतो हे पाहून ते कोड्यातच पडले. “त्यात काय एवढं,”
त्यांच्या मऊ आवाजात, हलकं हसत ते म्हणाले. “काल दुपारच्याला मी एक लगीन होतं तर
हितनं विट्याला गेलतो, तिथं बी सायकलनंच. मी सायकलवरच जात असतो सगळीकडे.”
रामापूरहून विट्याला जाऊन यायचं म्हणजे ४० किलोमीटर. अन् आदल्या दिवशी ऊन जरा
जास्तच होतं, ४०-४५ डिग्री तर नक्कीच.
“एक दोन वर्षांखाली पंढरपूरला जाऊन आले होते ते, जवळ जवळ १५० किलोमीटर,” संपत
मोरे सांगतात. “आता मात्र ते तेवढी सायकल चालवत नाहीत.”
त्यांना नेमून दिलेलं काम होतं, निरोप पोचवायचं. मात्र १९४३ मध्ये साताऱ्यात
शेणोलीला झालेल्या रेल्वे लुटीचं काम केलेल्या गटातही गणपती बाळा यादव सहभागी होते
गणपती यादव, जन्म १९२०, तुफान सेनेतले एक स्वातंत्र्यसैनिक. १९४३ मध्ये इंग्रजी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्याचं घोषित करणाऱ्या साताऱ्यातल्या भूमीगत प्रति सरकार ची सशस्त्र सेना म्हणजे तुफान सेना. प्रति सरकारच्या अखत्यारीत किमान ६०० (किंवा जास्त) गावं होती. इंग्रज राजवटीच्या विरोधात पुकारल्या गेलेल्या बंडात ते सहभागी होते. “माझं काम जंगलात दडून बसलेल्या क्रांतीकारकांना निरोप आणि डबे पोचवण्याचं होतं,” ते सांगतात. जीव धोक्यात घालून केलेले बहुतेक प्रवास पायी आणि नंतरच्या काळात सायकलवर केलेले होते.
गणपती यादव तेव्हाही शेती करायचे आणि आजही करतात. गेल्या रब्बीत त्यांनी
त्यांच्या अर्धा एकरात ४५ टन ऊस केला. त्यांच्याकडे वीस एकरहून जास्त जमीन होती,
पण बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांनी ती पोरांच्या नावे करून दिली आहे. ते राहतात त्याच
ठिकाणी त्यांच्या मुलांनी चांगली घरं बांधलीयेत. पण आजही गणपती यादव आणि त्यांच्या
पत्नी – वयाच्या ८५ व्या
वर्षीदेखील स्वतःच्या हाताने स्वयंपाक करणाऱ्या, साफसफाई करणाऱ्या – वत्सला एक मोठीशी खोली असणाऱ्या त्यांच्या साध्या
घरात राहणं पसंत करतात.
गणपती यादव इतके नम्र आहेत की ते स्वातंत्र्यसैनिक आहेत हे त्यांच्या
मुलांनाही फार उशीराने समजलं. त्यांचा थोरला मुलगा, निवृत्ती, शेतातच लहानाचा मोठा
झाला आणि वयाच्या १३ व्या वर्षी सोनारकाम शिकायला आधी इरोड्याला आणि नंतर
कोइम्बतूरला गेला. “मला स्वातंत्र्य चळवळीसाठी त्यांनी काय काम केलंय हे काही पण
माहित नव्हतं,” ते सांगतात. “जेव्हा, तुला तुझ्या बापानं काय धाडस दाखवलं ते माहित
आहे का असं जी. डी. बापू लाड [प्रति सरकारचे एक मोठे
नेते] यांनी मला विचारलं तेव्हा कुठे मला सारं समजलं.”
गणपती यादव सांगतात की बापू लाड त्यांचे शिक्षक आणि मार्गदर्शक. “त्यांनीच
माझ्यासाठी बायको शोधली, माझं लगीन लावून दिलं,” ते सांगतात. “नंतर, मी
त्यांच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षात पण गेलो. त्यांच्या अखेरच्या दिवसांपर्यंत
आम्ही संपर्कात होतो.”
“मी सातवीत होतो तेव्हा माझ्या एका मित्राच्या वडलांनी मला त्यांच्या
धाडसीपणाच्या कथा सांगितल्या,” त्यांचा दुसरा मुलगा, महादेव सांगतो. “तेव्हा कसं,
मला वाटायचं - एवढं काय मोठं केलंय. त्यांनी काही एखादा इंग्रज सैनिक किंवा पोलिस
मारला नव्हता. नंतर पुढे जाऊन मला त्यांचं काम किती महत्त्वाचं होतं ते उमगलं.”
त्यांना नेमून दिलेलं काम होतं, निरोप पोचवायचं. मात्र १९४३ मध्ये बापू लाड आणि तुफान सेनेचे नते कॅप्टन भाऊंच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात शेणोलीला झालेल्या रेल्वे लुटीचं काम केलेल्या गटातही गणपती बाळा यादव सहभागी होते.
“गाडीवर घाला घालायच्या चार दिवस अगोदर आम्हाला सांगावा आला की रुळावर दगडं
टाकायचीत म्हणून.”
ही गाडी इंग्रज (मुंबई इलाखा) अधिकाऱ्यांचा पगार घेऊन जाणार हे घाला घालणाऱ्या
लोकांना माहित होतं का? “आमच्या नेत्यांना माहित
होतं की. तिथं आत काम करणाऱ्यांनी [रेल्वे आणि सरकारमध्ये] त्यांना आधीच माहिती पुरवली होती. आम्हाला मात्र
गाडी लुटायला सुरुवात केली तवाच समजलं.
हल्ला करणारे किती होतात तुम्ही?
“ते कुणाला मोजायला येताती का? काही मिनिटात आम्ही
रुळावर दगड धोंड्याचा ढीग केलता. त्यानंतर आम्ही गाडी थांबल्या थांबल्या गाडीला
घेरावा घातला. आम्ही गाडी लुटत होतो तोवर आतल्या कुणीच विरोध बी केला नाही का कुणी
जागचं हललं बी नाही. एक गोष्ट ध्यानात घ्या, आम्ही काही हे पैशासाठी केलं नव्हतं.
आम्हाला इंग्रजांना धक्का पोचवायचा होता.”
या जहाल कारवाया वगळता, निरोप आणि इतर गोष्टी इथून तिथे पोचवायचं गणपती
यादवांचं काम फार किचकट होतं. “[रानानी लपलेल्या] आमच्या नेत्यांना रातच्याला जेवण
पोचवायचं. मी त्यांना रात्री भेटायला जायचो. त्यांच्यासंगं १०-१२ लोकं असायची.
इंग्रज सरकारनी या भूमीगत क्रांतीकऱ्यांना दिसताक्षणी गोळ्या घालायचे आदेश दिले
होते. आम्ही आडवाटेनं, लपत-छपत, वाटा काढत त्यांच्यापर्यंत पोचायचो. नाही तर
आम्हाला बी गोळ्या घातल्या असत्या पोलिसांनी.”
“आमच्या गावातल्या पोलिसांच्या खबऱ्यांनाही आम्ही चांगलाच धडा शिकविला,” गणपती यादव सांगतात. प्रति सरकारला ‘पत्री सरकार’ असं नाव कसं पडलं हे त्यांनी सांगितलं आम्हाला. त्या संदर्भात ‘पत्री’ म्हणजे फांदी. जेव्हा आम्हाला त्या खबऱ्यांमधला एक गावला आम्ही त्याच्या घराला घेरावा घालायचो. मग आम्ही त्या खबऱ्याला आणि गावातल्या दुसऱ्या एका माणसाला गावाबाहेर घेऊन जायचो.
“त्या खबऱ्याच्या घोट्यांमध्ये लाकडाचा दांडा अडकवायचो आणि त्याला उलटं टांगून
त्याचे पाय काठ्यांनी चांगलं बडवून काढायचो. आणि फकस्त पाय बडवायचो, बाकी अंगाला
कुठंच हात लावायचो नाही. फक्त पावलं. पुढचे किती तरी दिवस त्याला स्वतःच्या पायावर
चालताही यायचं नाही.” हा जालीम उपाय म्हणायचा. आणि म्हणून हे नाव – पत्री सरकार. “त्यानंतर
आम्ही त्याला गावातल्या त्या दुसऱ्या माणसाच्या पाठीवर लादायचो आणि गावी पाठवायचो.
“बेलवडे, नेवरी, तडसर अशा गावातल्या लोकांना आम्ही असा धडा शिकविला होता. तडसर
गावात एक नानासाहेब नावाचा खबऱ्या रहायचा, मोठ्या बंगल्यात. आम्ही रात्री त्याच्या
बंगल्यात घुसलो. पाहतो तो काय फक्त बाया झोपलेल्या. तेवढ्यात कोपऱ्यात झोपलेली एक
बाई आमच्या नजरेस पडली. पायापासून डोक्यापर्यंत तिने लुगडं पांघरून घेतलं होतं.
बाकी बायांपेक्षा ही एकटीच ताठ झोपलेली पाहून आमच्या मनात शंका आली. तोच गडी होता हे
समजल्यावर आम्ही त्याच्या अंथरुणासकट त्याला उचलला आणि बाहेर नेला.
नाना पाटील (प्रति सरकारचे नेते) आणि बापू पाटील त्यांचे आदर्श होते. “नाना
पाटील काय माणूस होता सांगू – उंचा पुरा, तगडा आणि बेडर. काय भाषणं द्यायचे ते.
इथली बडी बडी लोकं त्यांना बोलवायची, पण ते मात्र साध्यासुध्या माणसांकडेच जायाचे.
या बड्या लोकातले काही जण इंग्रजांचे चमचे होते. आमची नेते मंडळी सांगायची, “या
इंग्रज सरकारला बिलकुल घाबरायचं नाही, आणि आपण जास्त लोक मिळून जर एकत्र अशी कामं
केली तर आपण या इंग्रजांपासून सुटका करून घेऊ शकतो.” गणपती यादव आणि त्यांच्या
गावातले १००-१५० जण तुफान सेनेत सामील झाले.
तेव्हासुद्धा त्यांनी महात्मा गांधींबद्दल ऐकलं होतं. “पण मी कधी त्यांना भेटू
शकलो नाही. मी एकदा पंडित जवाहरलाल नेहरूंना पाहिलं होतं, [उद्योजक] शंकरराव
किर्लोस्करांनी त्यांना इकडे बोलावलं होतं. भगत सिंगाबद्दल मात्र आम्ही ऐकलं होतं.”
गणपती बाळा यादवांचा जन्म शेतकऱ्याच्या घरातला. त्यांना फक्त एक बहीण. ते लहान
असतानाच त्यांचे आई-वडील वारले आणि मग ही भावंडं त्यांच्या नातेवाइकांकडे लहानाची
मोठी झाली. “मी दोन चार वर्षं शाळा शिकलो असेन, त्यानंतर मात्र रानात काम करावं
लागायचं म्हणून मी शाळा सोडली.” लग्न झाल्यावर मात्र ते त्यांच्या आईवडलांच्या, मोडकळीला
आलेल्या घराकडे आणि थोड्या फार रानाकडे परतले. त्यांच्या लहानपणचे कोणतेही फोटो
नाहीत आणि अर्थात फोटो काढून घेण्याची त्यांची परिस्थितीदेखील नव्हती.
पण, त्यांनी प्रचंड मेहनत केली – आणि आज वयाच्या ९७ व्या वर्षीदेखील ती चालूच
आहे. “मी गूळ कसा करायचा ते शिकलो आणि मग जिल्ह्यात सगळीकडे मी गूळ विकायला
सुरुवात केली. आमची सगळी कमाई आम्ही लेकरांच्या शिक्षणावर खर्चायचो. शिक्षण पूर्ण
झाल्यावर ती मुंबईला गेली, कमवू लागली आणि आम्हाला पैसा धाडायला लागली. मग मी
गुळाचा धंदा बंद केला आणि जमिनीत पैसा घातला. हळू हळू आमची शेती सुधरायला लागली.”
मात्र आजच्या घडीला शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले पाहून गणपती यादव नाराज
आहेत. “आम्ही स्वराज्य तर मिळविलं पण आम्हाला जे हवं होतं ते काही आम्हाला मिळालं
नाही.” सध्या देशात आणि राज्यात जी सरकारं आहेत ती आधीच्यांपेक्षाही वाईट आहेत,
अन् आधीची देखील वाईटच होती. “आता अजून पुढे जाऊन ते आणखी दिवस दाखवतील ते काय
सांगू शकत नाही,” ते म्हणतात.
तुफान सेनेसाठी सांगावे धाडायचं काम पायीच चालायचं, मात्र गणपती यादव २०-२२ वर्षांचे असताना सायकल चालवायला शिकले. त्यानंतर मात्र भूमीगत राहून सगळं काम त्यांनी सायकलवरूनच केलं. “आमच्या काळात सायकलचं फार अप्रूप होतं. या नव्या तंत्रज्ञानाबद्दल गावात खूप चर्चा व्हायची. सायकल चालवायला मी माझा माझाच शिकलो, चालवायचं, पडायचं, किती तरी वेळा पडलोय मी.”
दुपार टळून गेली होती. ९७ वर्षांचे गणपती यादव पहाटे ५ वाजताच उठलेत. पण
आमच्याशी तास न् तास बोलूनसुद्धा थकव्याचा लवलेश नाही. एकदाच त्यांच्या कपाळावर
आठी आली ती म्हणजे मी त्यांना त्यांची सायकल किती जुनी आहे हे विचारल्यावर. “ही
सायकल? २५ वर्षांपासून आहे ही. त्या आधीची ५० वर्षं तरी
माझ्याकडे होती, पण कुणी तरी चोरली ती,” ते खेदाने सांगतात.
आम्ही निघालो तसं त्यांनी माझा हात घट्ट धरून ठेवला. तुम्हाला काही तरी
द्यायाचं आहे, क्षणभर थांबा असं सांगत ते त्यांच्या इवल्याशा घरात आत गायब झाले.
मग त्यांनी एक फुलपात्र घेतलं, एका पातेल्यात बुडवलं. मग बाहेर येऊन भांडंभर ताजं
दूध माझ्या पुढ्यात धरलं. मी ते पिताच त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घट्ट
धरला. त्यांचे डोळे पाणावले. आणि माझेही भरून आले. त्यानंतर बोलण्यासारखं काहीही
उरलं नव्हतं. काही क्षण का होईना गणपती बाळा यादवांच्या आयुष्याचा भाग होण्याचं
भाग्य आम्हाला मिळालं ही भावना मनात ठेऊनच आम्ही त्यांचा निरोप घेतला.
अनुवादः मेधा काळे