अनंतपूरच्या टोमॅटोच्या बाजाराशेजारचं हे रान म्हणजे भाव पडल्यावर ही भाजी किंवा फळ फेकून देण्याचं हक्काचं ठिकाण झालंय. (ब्रिटानिका ज्ञानकोष म्हणतो टोमॅटो हे एक फळ असून आहारतज्ज्ञ मात्र त्याची गणना भाजी म्हणून करतात). आजूबाजूच्या गावांतून आलेले शेतकरी विकला न गेलेला माल इथे फेकून जातात. इथे शेरडांची कायम गर्दी असते. “पण पावसाळ्यात बकऱ्यांनी टोमॅटो खाल्ला तर त्यांना ताप येतो,” पी. कदिरप्पा सांगतात. ते मेंढपाळ आहेत आणि इथनं पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या बुक्करायसमुद्रम गावातून आपली शेरडं-मेंढरं इथे घेऊन येतात.

बकऱ्यांची तब्येत गायींपेक्षा नाजूक असते आणि त्यांना ताप वगैरे येतो. माझ्यासाठी हे नवीन होतं. अनंतपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतोय त्यामुळे बकऱ्यांना त्यांच्या आवडीचं फळ खायला मनाई आहे. पण तिथेच आसपास हे जितराब काही तरी गवत आणि तण खात रेंगाळत होतं. आपल्याहून महाकाय असणाऱ्या शत्रूंकडे कटाक्ष टाकत. आपल्या जनावरांना मिळणाऱ्या मेजवानीसाठी हे पशुपालक शक्यतो शेतकऱ्यांना काही मोबदला देत नाहीत. कारण कधी कधी तर एका दिवसात हजारोच्या संख्येत इथे टोमॅटो टाकला जातो.

अनंतपूरच्या बाजारात टोमॅटो शक्यतो २० ते ३० रुपये किलो भावाने विकला जातो. शहरातल्या रिलायन्स मार्टमध्ये तो सगळ्यात स्वस्त मिळू शकतो. “आम्ही एकदा फक्त १२ रुपये किलो दराने टोमॅटो विकलाय,” मार्टमधला एक कर्मचारी सांगतो. “त्यांचे स्वतःचे पुरवठादार असतात,” मार्टबद्दल एक भाजीविक्रेता म्हणतो. “आम्हाला मार्केट यार्डातून माल खरेदी करावा लागतो. दिवसाच्या अखेरीस माल खराबच होणार असेल तर आम्ही तो फेकून देतो.”

This field near the Anantapur tomato market yard serves as a dumping ground when prices dip
PHOTO • Rahul M.

अनंतपूरच्या टोमॅटो बाजाराच्या मागचं हे रान म्हणजे किंमती उतरल्यावर टोमॅटो फेकून देण्याचं हक्काचं ठिकाण

अर्थात हा भाव बाजारात गिऱ्हाईक खरेदी करतात तो भाव आहे. शेतकऱ्यांना मात्र कवडीमोलाने माल विकावा लागतो – ६ रु. किलोपासून २० रुपये किलोपर्यंत. टोमॅटोचं वाण आणि बाजारात यायचा काळ यावर भाव ठरतो. चढा भाव क्वचितच मिळतो आणि तोही एक दोन दिवसच टिकतो. विक्रेते शेतकरी त्यांच्या किती जवळ किंवा दूर आहे यावर जोखीम घेतात. अर्थात सगळ्यात जास्त जोखीम कुणाला, तर शेतकऱ्याला. आणि कमीत कमी, या भागातले टोमॅटो खरेदी करणाऱ्या कॉर्पोरेट दुकानांच्या साखळ्यांना.

एका व्यापाऱ्याने एक अख्खा ट्रकभर टोमॅटो ६०० रुपयांना विकत घेतला. अर्थात भाव पडल्यावरच. नंतर त्याने बाजारापाशीच तो माल विकला. “१० रुपये द्या आणि हवा तेवढा माल न्या” अशी हाळी त्याचा विक्रेता घालत होता. अर्थात तुमच्याकडची पिशवी लहान असली तरच. मोठ्या पिशवीचे २० रुपये. त्याने त्या दिवशी चांगलीच कमाई केली असणार.

हा फोटो मी ज्या दिवशी घेतला त्या दिवशी अनंतपूर शहरातल्या भाजीवाल्यांकडे टोमॅटो २० ते २५ रु किलो भावाने विकला जात होता. रिलायन्स मार्टने त्या दिवशी १९ रु. किलो असा भाव निश्चित केला होता. इथल्या दुकानांमध्ये तुम्हाला नेस्ले आणि हिंदुस्तान लीवरसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना बनवलेल्या सॉसच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतील. अनंतपूरमध्ये टोमॅटोच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त नफा याच कंपन्या कमवत असाव्यात. आणि हे सॉस कदाचित इथल्या विशेष आर्थिक क्षेत्रांमधल्या कारखान्यांमध्ये तयार झाले असावेत (ज्यांना सरकारकडून भरपूर सुविधा मिळतात).

टोमॅटोच्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष त्याच्या रानात-बाजारात अशा सगळ्या सुविधा मिळाल्या तर... पण त्यांना काही त्या मिळत नाहीत. दरम्यानच्या काळात भाव कोसळले की गायी मात्र या रसाळ मेजवानीचा आनंद लुटत राहतात.

Rahul M.

Rahul M. is an independent journalist based in Andhra Pradesh, and a 2017 PARI Fellow.

Other stories by Rahul M.
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale