बिहारच्या बांका जिल्ह्यातल्या चिरचिरियामध्ये ८० उंबऱ्याचा संथाल पाडा आहे. बहुतेकांकडे जमिनीचा छोटा तुकडा आणि काही जितराब आहे. बहुतेक वेळा पाड्यावरचे पुरुष जवळपासच्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये शेतमजुरीसाठी किंवा बांधकाम मजूर म्हणून कामाला जातात.
“हे बारा-रुपी गाव आहे, म्हणजे इथे सगळ्या गोताची माणसं राहतात,” चिरचिरिया गावचे जुनेजाणते सिधा मुरमू सांगतात. “संथालांमध्येही अनेक गोत आहेत – मी मुरमू आहे, अजून बिसरा आहेत, हेंबराम, तुडू...”
मी सिधांना विचारलं की ते किंवा इतर कुणी मला संथालीमध्ये एखादी गोष्ट किंवा म्हण सांगतील का ते. “त्यापेक्षा आम्ही गाणंच गातो ना,” ते म्हणाले. त्यांनी लगेच वाद्यं मागवली – दोन मानहर (ढोलकीसारखं तालवाद्य), एक दिघा (डग्गा) आणि झाल (टाळ). खिता देवी, बारकी हेंबराम, पाक्कू मुरमू, चुटकी हेंबराम आणि इतर काही बाया वाद्यांचा आवाज येताच झटक्यात गोळा झाल्या. त्यांना जरा गळ घातल्यावर त्यांनी हातात हात घातले आणि एक गोड गाणं सुरू केलं.
इथे जे गाणं तुम्ही पहाल त्यात त्या त्यांच्या जगण्याविषयी आणि सोहराईच्या सणाविषयी गातायत. जानेवारी महिन्यात साजरा होणारा हा १२ दिवसांचा सण म्हणजे सुगीचा सोहळा असतो. या काळात संथाळ त्यांच्या जनावरांची आणि त्यांच्या देवतांची पूजा करतात, आपली जमीन अशीच फळू-फुलू दे अशी प्रार्थना करतात. यानंतर असते मोठी मेजवानी आणि गाणं-बजावणं आणि नाच.