तमिळनाडूतल्या ज्या हिजडा समुदायाच्या लोकांनी माझ्याबरोबर मनसोक्त वेळ घालवला ते स्वतःला ‘अरावनी’ संबोधतात. बऱ्याच काळाने मला समजलं की त्यांच्यातल्या बऱ्याच जणांनी हे नाकारलंय आणि ते स्वतःला ‘थिरुनंगई’ म्हणवून घेतात. त्यांचा आदर राखत मी मात्र माझ्याशी जे लोक बोलले त्यांनी स्वतःची जी ओळख मला सांगितली तीच इथे वापरली आहे.

“हा आमचा सण आहे. दहा दिवस, आम्ही एक वेगळं जग जगतो. गेले काही दिवस मी तंद्रीतच आहे आणि मला त्यातून बाहेरच यायचं नाहीये,” जयमाला सांगते. २०१४ मध्ये विलुप्पुरम जिल्ह्याच्या कुवागम गावी मी या २६ वर्षांच्या अरावनीला भेटलो. तमिळ दिनदर्शिकेनुसार चित्रई महिन्यात (एप्रिलच्या मध्यापासून मेच्या मध्यापर्यंत) १८ दिवस चालणाऱ्या या वार्षिक उत्सवासाठी जयमाला इथे आलीये.

देशभरातले अनेक हिजडे कुवागममध्ये येतात, सौंदर्य स्पर्धा, गाणी आणि नाचाच्या स्पर्धा आणि इतरही बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावतात. अनेक जणी अरावनशी ‘लग्न’ लावायला येतात. कूथान्दवर (अरावनचं स्थानिक नाव) देवाच्या देवळात हे लग्न लागतं. महाभारतातल्या एका कथेप्रमाणे सगळ्या गोष्टी केल्या जातात.

काय आहे ही कथाः अरावन हा अर्जुन आणि नागकन्या उलुपीचा मुलगा कालीला बळी जायला तयार होतो, जेणेकरून पांडव कौरवांवर विजय मिळवू शकतील. त्याची शेवटची इच्छा इतकीच की त्याचं लग्न व्हावं. पण दुसऱ्या दिवशीच तो बळी जाणार असल्याने कुणीच त्याच्याशी लग्नाला तयार होत नाही. म्हणून मग कृष्ण मोहिनीचं रुप घेऊन अरावनशी लग्न लावतो – आणि अर्थात दुसऱ्या दिवशी विधवा होतो.

कुवागमच्या या उत्सवात अरावनी हा सगळा प्रसंग जगतात, लग्न लावतात, अरावन बळी जातो आणि त्या विधवाही होतात. मी पोचलो तेव्हा लग्नाचा सोहळा सुरू झाला होता. गाभाऱ्यात देवळाचा पुजारी एकामागोमाग एका अरावनीचे लग्नाचे विधी पार पाडत होता. बाहेर, अरावनी नाचत होत्या, हार, ‘थाली’ (मंगळसूत्र) आणि काकणं घेत होत्या.

बंगळुरूहून आलेल्या अरावनींचा एक गट मला भेटला, त्यांची म्होरकी प्रज्वलाने सांगितलं, “मी गेली १२ वर्षं इथे येतीये. या समाजात राहणं आमच्यासाठी फार अवघड आहे. पण इथे आलं की माझ्या मनात आशा निर्माण होते की कधी तरी हा समाज आम्हाला स्वीकारेल. या देवाची पत्नी होणं हे आम्हाला मान्यता मिळाल्यासारखं आहे.”

बहुतेक सगळा उत्सवा आनंदोल्लासाचा असला तरी त्याला एक काळी किनारही आहे. गर्दीत पुरुषांकडून लैंगिक शोषण आणि पोलिसांकडून शिवीगाळ होत असल्याचं अरावनी सांगतात. पण ३७ वर्षीय आयव्ही म्हणते, “तरीही मी इथे येते आणि येत राहीन.” असं म्हणून ती गर्दीत नाहिशी होते. तिला दर वर्षी इथे का यावंसं वाटतं हे मला विचारायचं होतं. पण खरं तर उत्तर स्पष्ट आहेः हा त्यांचा सोहळा आहे. इथे त्या जशा आहेत तसंच त्यांचं स्वागत होतं.

PHOTO • Ritayan Mukherjee

तमिळ नाडूच्या विलुप्पुरम शहरापासून ३० किलोमीटरवर असलेल्या कूवागम गावातलं अरावन (स्थानिक याला कूथान्दवर म्हणतात) देवाचं देऊळ

PHOTO • Ritayan Mukherjee

महाभारतात अरावन देवाशी लग्न होतं तो प्रसंग अरावनी उभा करतात. लग्नासाठी सजून तयार होताना

PHOTO • Ritayan Mukherjee

कूथान्दवर देवळातले एक पुजारी लग्नाचे विधी सुरू करतायत. अरावनाशी लग्न झाल्याचं द्योतक म्हणून प्रत्येक अरावनीच्या गळ्यात पिवळ्या रंगाचा धागा, थाली बांधतात

PHOTO • Ritayan Mukherjee

आपल्या देवाशी लग्न झाल्याने कृतार्थ भावनेने एक वयस्क अरावनी मंदिरातून बाहेर पडतीये

PHOTO • Ritayan Mukherjee

समाजात हिजडा बायांना जरी वाळीत टाकलं जात असलं तरी लोक त्यांचा शकुन चांगला मानतात. कूथान्दवर मंदिराच्या बाहेर लोक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जमा होतात

PHOTO • Ritayan Mukherjee

पिंकी (मध्यभागी), चेन्नईला लागून असलेल्या गावांमधून आलेल्या नवपरिणित अरावनींची म्होरकी, लग्न झाल्यामुळे उल्लसित झालीये

PHOTO • Ritayan Mukherjee

एकदा का लग्न लागलं, की अरावनी तो आनंद साजरा करतात. पिंकी (उजवीकडे) आनंदाच्या भरात तिच्या सख्ख्या मैत्रिणीचं, सोबतच लग्न झालेल्या मालाचं चुंबन घेतीये

PHOTO • Ritayan Mukherjee

लग्नाचे विधी पार पडलेत आणि धमाल करण्याची वेळ. अरावनी वधू गायला सुरुवात करतात आणि नववधूच्या वेशात रात्रभर आनंद साजरा करतात

PHOTO • Ritayan Mukherjee

दुसऱ्या दिवशी सकाळी, उत्सवाचा शेवटचा आणि अरावनाच्या बळी जाण्याचा दिवस. आता अरावनी शोक करू लागतात – एकत्र येऊन, फेर धरून त्या जोरजोरात रडतात

PHOTO • Ritayan Mukherjee

एक पुजारी अरावनीची काकणं वाढवतो – विधवा झाल्याचा हा एक विधी. ती दुःखात बुडलेली दिसतीये आणि मग हुंदका फुटतो. मंदिरात आलेले लोक बाजूने बघत उभे आहेत

PHOTO • Ritayan Mukherjee

पुजारी अरावनींच्या गळ्यातल्या थाली तोडतात आणि मंदिराबाहेरच्या आगीत टाकतात. उत्सवासाठी आसपासच्या गावातून आलेले लोक भोवताली जमा होतात

PHOTO • Ritayan Mukherjee

अरावनींना आता वधूचा पेहराव उतरवून विधवेची सफेद वस्त्रं नेसावी लागणार. या छायाचित्रात पुजाऱ्याने सफेद साडी हाती दिल्यावर अरावनीचा बांध फुटतो

PHOTO • Ritayan Mukherjee

अरावनाचा बळी दिल्याचं दुःख अरावनी ऊर बडवून आणि माथा आपटून व्यक्त करतायत

PHOTO • Ritayan Mukherjee

मंदिराच्या बाहेर विवाहाच्या खुणा असणाऱ्या गोष्टी विखुरल्या आहेत – विस्कटलेले हार, फुटलेली काकणं आणि तोडून टाकलेल्या थाली

PHOTO • Ritayan Mukherjee

सफेद साडी नेसलेली अरावनी मंदिराजवळून चाललीये, काही जणी अरावनाच्या मृत्यूचा महिनाभर शोक करतात

या चित्रनिबंधाची आधीची आवृत्ती छायाचित्रकाराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.

अनुवादः मेधा काळे

Ritayan Mukherjee

Ritayan Mukherjee is a Kolkata-based photographer and a PARI Senior Fellow. He is working on a long-term project that documents the lives of pastoral and nomadic communities in India.

Other stories by Ritayan Mukherjee
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale