“आम्हाला सगळे अशी तुच्छतेची वागणूक का देतात?” शीतल विचारते. “किन्नर म्हणून जन्माला आलो म्हणून काय आम्हाला आमची इज्जत नाही का?”

वर्षानुवर्षं आलेले कटू अनुभव शीतलच्या शब्दातून व्यक्त होत होते. वय २२, पण दहा वर्षं भेदभाव सहन केलेला आहे – शाळेत, कामावर, रस्त्यावर, जवळ जवळ सगळीकडेच.

या सगळ्याची सुरुवात झाली, इचलकरंजीच्या नेहरूनगरमध्ये जेव्हा ती १४ वर्षांची होती तेव्हा – तिचं नाव होतं अरविंद. “मी आठवी – नववीत होते तेव्हा मला वर्गातल्या मुलींसारखे कपडे घालू वाटायचे. हे असं का होतंय मला अजिबात कळत नव्हतं... मी आरशात मलाच न्याहाळत बसायचे आणि मग माझे वडील खेकसायचे, ‘असा बायल्यासारखा आरशात काय पाहत बसलायस, जा जरा पोरात खेळ’. मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला साडी ल्यायचीये, पोरीसारखं रहायचंय, त्यांनी मला मारलं अन् म्हणाले, तुला वेड्याच्या हॉस्पिटलात टाकेन. त्यांनी मला मारलं तेव्हा खूप रडले मी...”

शीतलच्या (तिच्या विनंतीवरून नाव बदललं आहे) घरच्यांनी त्यांचा पोरगा ‘बरा’ व्हावा म्हणून त्याला तांत्रिकाकडे नेऊन गंडेदोरे केले. “माझी आई म्हणायची माझ्यावर कोणी तरी करणी केलीये. माझ्या बापानं [जे भंगार व्यावसायिक होते] कोंबडं पण चढवलं. माझ्या आई-वडलांना हेच समजत नव्हतं की मी जरी पुरुष म्हणून जन्माला आलो असलो तरी मला एका बाई व्हायचं होतं. त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही.”

सोळाव्या वर्षी शीतलनं घर सोडलं आणि ती बाजार मागायला लागली – आजही ती हेच काम करतीये. सकाळी १० वाजल्यापासून सांजेपर्यंत ती दुकानात जाऊन पैसे मागते, जवळच्या जयसिंगपूर, कोल्हापूर आणि सांगलीसारख्या शहरात जाऊनही ती बाजार मागते आणि दिवसाचे १००-५०० रुपये मिळतात तिला. कधी कधी तिला आणि तिच्या चार-पाच मैत्रिणींना लग्नात किंवा बारशाला, सणासुदीला नाचायला बोलावतात तेव्हा लोक दोन तीन हजार रुपये देतात.

Mastani Nagarkar asking for money outside a shop
PHOTO • Minaj Latkar

‘एखाद्या असहाय्य माणसासारखं हात पसरत फिरणं मला तरी कुठं आवडतंय,’ शीतल म्हणते

घरच्यांनी शीतलला त्यांचा पोरगा ‘बरा’ व्हावा म्हणून तांत्रिकाकडे नेऊन गंडेदोरेही केले. ‘माझी आई म्हणायची माझ्यावर कोणी तरी करणी केलीये. माझ्या बापानं कोंबडंही चढवलं. माझ्या आई-वडलांना हेच समजत नव्हतं की मी जरी पुरुष म्हणून जन्माला आलो असलो तरी मला एका बाई व्हायचं होतं.’

एकटीनं राहणं आणि काम करणं यामुळे हा भेदभाव आणखीच वाढलाय. “मी जेव्हा बाजार मागायला जाते, तेव्हा लोक पदर खेचतात, अश्लील हावभाव करतात. काही दुकानदार आमच्याकडे संशयाने पाहतात, जसं काही आम्ही चोर आहोत.” घरीदेखील, शीतल सांगते, “वस्तीतली काही माणसं रात्री दार वाजवतात, सेक्सची मागणी करतात. मी एकटीच असते आणि मला सतत भीती वाटत राहते.”

शीतलचं सध्याचं घर इचलकरंजीच्या शहापूर भागातल्या वस्तीत आहे. फार कष्टानं मिळालीये तिला ही खोली. आई-वडलांचं घर सोडल्यानंतर ती काही काळ बस स्टँडवर झोपायची. “महिन्याला २००० रुपये भाडं भरावं लागतं. एखादं जनावरदेखील राहणार नाही असली हालत आहे या खोलीची. पावसाळ्यात सगळं पाणी भरतं – मग मी बस स्टँडवरच झोपायला जाते. अगदी वेळेवर भाडं भरत असले तरी मला एखादी चांगली खोली मिळत नाही. मलाही चांगल्याशा घरात रहावं वाटतंच की, पण आम्हाला कुणीच भाड्याने घर देत नाहीत. आमच्या घरचेच आणि समाज आम्हाला आपलं मानत नाही मग आम्ही कुणाच्या तोंडाकडे पहावं?”

शीतलचा हा संघर्ष इचलकरंजीतल्या सगळ्याच तृतीयपंथीय समाजाचा संघर्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातल्या या शहराची लोकसंख्या २.८८ लाख आहे. हा संघर्ष घरात, शाळेत, कॉलेजमध्ये, घर शोधण्यात आणि अगदी रस्त्यावरचाही आहे.

घरच्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? अविश्वास ते संताप, नकार आणि जबरदस्तीने लावलेली लग्नं. जेव्हा सकिनानी (बाई म्हणून तिला हे नाव पसंत आहे) घरच्यांना सांगायचा प्रयत्न केली की तिला बाईसारखं रहायचंय, त्यांनी (तिच्याकडे ते एक मुलगा म्हणूनच बघत असल्या कारणाने) एखाद्या पोरीशी लग्न कर म्हणून जबरदस्ती केली. सामाजिक कलंकाची भीती म्हणून सकिनाने वयाच्या २७ व्या वर्षी लग्न केलं. ती/तो आता नेहरू नगरच्या वस्तीमध्ये घरी आणि दारी एक पुरुष म्हणून राहतो.

“कधी कधी हिजडा समाजाचा काही कार्यक्रम असेल तर मी गुपचुप साडी नेसून तिथे जाते,” ३३ वर्षांची सकिना सांगते. “पण घरी मात्र मी एक बाप, एक नवरा म्हणून वावरते. माझी एक बाई म्हणून जगायची इच्छा मला नाही पूर्ण करता येत. माझं जगणंच दुहेरी आहे – मनानी बाई आणि जगासाठी मात्र पुरुष.”

Radhika with her family
PHOTO • Minaj Latkar
Radhika getting ready in a traditional saree and jewellery for her daily round of the markets to ask for money
PHOTO • Minaj Latkar

घरकाम करणाऱ्या आणि भंगार वेचणाऱ्या सुमन, राधिका गोसावीची आई (डावीकडे बसलेल्या) म्हणतात, ‘पोटच्या लेकाला असं घराबाहेर कसं काढावं?’

सकिनापेक्षा, ३० वर्षांच्या सुनीताची (नाव बदललं आहे) कहाणी वेगळी आहे. घरच्यांनी जबदरदस्तीने ठरवलेलं लग्न करण्याचं तिने नाकारलं. पण सकिनाप्रमाणेच तीही एका पुरुषाचंच जिणं जगतीये, तिला स्वतःला जसं वाटतं की आपण बाई आहोत, तसं नाही. सुनीताला काही घरच्यांना हे सांगण्याची हिंमत झाली नाही. तिचे वडील किराण्याच्या धंद्यात आहेत आणि आई गृहिणी आहे. “लग्न कर म्हणून ते माझ्या मागे लागले होते, पण तसं करून एखाद्या पोरीचं आयुष्य मी का म्हणून बरबाद करावं? म्हणून मग मी घर सोडायचं ठरवलं. आमच्या [मराठा] समाजात जर मी तृतीयपंथी आहे हे लोकांना कळलं तर आमच्या घराण्याच्या नावालाच बट्टा लागेल, माझ्या बहिणींची लग्नं व्हायची नाहीत, घरच्यांना खूप सोसावं लागेल. लोक काय म्हणतील या भीतीनेच मी घर सोडून जायचं ठरवलं.”

सुनीताने घर सोडून नेहरू नगरमध्ये खोली घेतली तेव्हा ती २५ वर्षांची होती. “तेव्हापासून, मी अनेक जणांना भेटलीये जे माझ्यासारखेच आहेत,” ती म्हणते. “पण पोटासाठी त्यांना बाजार मागावा लागतो. कुणीच त्यांना कामं देत नाहीत किंवा भाड्याने घर देत नाहीत. त्यांचे भोग पाहून माझी साडी नेसायची हिंमतच होत नाही. पण असं जगणंही फार अवघड आहे.”

काही घरांमध्ये मात्र थोड्या फार प्रमाणात स्वीकार आढळतो. आता पंचविशीची असणारी राधिका गोसावी, (कव्हर फोटोतील) जेव्हा १३ वर्षांची होती तेव्हा तिला कळून चुकलं की ती तृतीयपंथी आहे. तिच्या आई आणि बहिणींनी सुरुवातीला विरोध केला. भंगार वेचणारे तिचे वडील ती १० वर्षांची असतानाच वारले होते.

“मला माझ्या आईसारखी वेणी घालायला आवडायचं, माझ्या बहिणींसारखे कपडे घालायला, कुंकू, काजळ आणि लिपस्टिक लावायला आवडायचं. त्यांच्यासारखं घरकामही आवडायचं. पण हे असं मला का वाटतंय ते काही मला कळायचं नाही,” आता नेहरूनगरमध्ये राहणारी राधिका (आधीचा संदीप) सांगते. “मला एखाद्या बाईसारखं रहायचंय असं जेव्हा मी आईला सांगितलं, तेव्हा ती घाबरली, ढसाढसा रडली. माझ्या बहिणी म्हणायच्या, ‘तू आमचा एकुलता एक भाऊ आहेस, पोरानं पोरासारखं रहावं. लग्न करून आम्हाला भावजय आणायची, नोकरी करायची – ते सोडून असलं पातळ नेसायचं काय खूळ भरलंय तुझ्या डोक्यात?’ आमच्या नातेवाइकांनी आमच्या आईला सांगितलं की मला घरातून बाहेर काढ म्हणून. ‘जरा घराबाहेर रडून दिस काढले की मुकाट [सुधरून] घरी येईल तो,’ ते सांगायचे.”

पण राधिकाने विरोध केला. “मी आईला म्हटलं की मी घर सोडून जाते.” काही काळानंतर तिच्या आईनं, घरकामगार आणि भंगार गोळा करणाऱ्या सुमन यांनी तिचं ऐकलं. “पोटच्या लेकाला असं घराबाहेर कसं काढावं?” मी त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटले तेव्हा त्या म्हणाल्या. “बाहेर कोण लोक आधार देणार त्याला? उगा वाईट संगतीला लागण्यापेक्षा लेकरू आपल्या सोबत राहिलेलं चांगलं असं वाटायचं मला. आम्हाला शेजारी-पाजारी आणि आमचे नातेवाईक नावं ठेवायचे, पण सगळं सहन केलं मी.”
Aliya Sheikh
PHOTO • Minaj Latkar

अलियाच्या भावंडांना तिला लोकात ओळख दाखवायची लाज वाटते

‘माझ्या भावाने बजावलंय, तू माझा भाऊ आहेस असं कुणाला देखील सांगू नकोस. माझ्या बहिणींची लग्नं झालीयेत पण मी त्यांच्या सासरी काही जरी कार्यक्रम असले तरी जात नाही. त्यांना नाही आवडत,’ अलिया सांगते. पोटासाठी ती बाजार मागते. ‘एक माणूस म्हणून कुणीच आमच्याकडे पाहत नाही’

आपल्या घरच्यांसोबत नेहरूनगरमध्ये राहणारी अलिया शेख सांगते, तिच्या थोरल्या भावांना – दोघं कापडगिरणीत कामाला आहेत, एक कापड दुकानात – लोकात तिला ओळख दाखवायचीही लाज वाटते कारण ती तृतीयपंथी आहे. आम्ही भेटलो तेव्हा तिचे रोजे होते पण तरीही बाजार मागणं चालूच होतं. “माझ्या भावानं बजावलंय, तू माझा भाऊ आहेस असं कुणाला देखील सांगू नकोस. माझ्या बहिणींची लग्नं झालीयेत पण मी त्यांच्या सासरी काही जरी कार्यक्रम असले तरी जात नाही. त्यांना नाही आवडत.”

घरातल्या ताणतणावासोबतच शिक्षण घेऊन, सन्मानाने काम करून कमवायचं तर तोही मोठा संघर्षच आहे. शीतलनी घर सोडलं तेव्हा ती १६ वर्षांची होती, बारावीपर्यंत शिकलेली होती. “मला पुढे शिकायचंय,” ती म्हणते. “मी पण हुशार आहे, मला पण स्वाभिमान आहे. एखाद्या असहाय्य व्यक्तीसारखं हात पसरत फिरणं मला तर कुठे आवडतंय. मला शिकून ऑफिसमध्ये नोकरी करायचीये.”

सकिना – तृतीयपंथी नाही तर एका पुरुषासारखं राहून – मराठी साहित्यामध्ये एम ए, बी एड करू शकली (विद्यापीठाचं नाव तिला उघड करायचं नाहीये). पण फार मोठा झगडा होता तो. सकिनाला कॉलेजसाठी पैसे लागायचे. मग अनेक वर्षं तिने धंदा केला. वर्गातल्या काहींना हे माहित होतं, मग ते घरच्यांना सगळं सांगू अशी धमकी देऊन तिच्याशी सेक्स करायचे. काही शिक्षक तिला रिकाम्या वर्गात बोलवून लैंगिक स्वरुपाच्या मागण्या करायचे. “मी बाईसारखे कपडे घालायचे नाही तरी माझ्या चालण्या-बोलण्यावरून कळायचं की मी तृतीयपंथी आहे,” ती सांगते. “मला त्या सगळ्या छळवणुकीचा वात आला होता आणि कितीदा तरी आत्महत्येचा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. [गवंडीकाम करणारे] माझे वडील माझ्या तिघी बहिणींची लग्नं लावता लावता कर्जाच्या खाईत बुडाले होते. [धंदा करून] मला जे काही पैसे मिळायचे त्यातनं मी कसं तरी माझं शिक्षण पूर्ण केलं. तसंही लोकांना वाटतंच की आम्ही धंदा करतो म्हणून.”

सकिना आता इचलकरंजीतल्या एका क्षयरोग किंवा एचआयव्ही असणाऱ्या व्यक्तींना सहाय्य करणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये काम करते. तिला महिन्याला ९,००० रुपये पगार मिळतो.

Some shopkeepers drive them away from the shops and curse them. These three shopkeepers were harassing Radhika with lewd behaviour and driving her away from the shop
PHOTO • Minaj Latkar

‘अनेकदा दुकानदार आम्हाला हाकलून लावतात. चार घास खाता यावेत यासाठी आम्ही सगळं सहन करतो,’ राधिका सांगते

घरच्यांनी स्वीकारलं असलं तरी राधिकासाठी देखील काम शोधणं सोपं नव्हतं. तिसरीनंतर तिला शाळा सोडावी लागली होती. तिच्या वडलांप्रमाणे तीदेखील भंगार वेचायला किंवा विटांचे थर लावायच्या कामाला जायची. “वयाच्या १६-१७ व्या वर्षी साडी नेसायला लागले आणि लोकांनी मला काम द्यायचं बंद केलं,” ती सांगते. त्यामुळे ती आता ८०-१०० दुकानात बाजार मागते. दुकानदार तिला एक रुपयापासून १० रुपये देतात. सकाळी १० ते संध्या ७ वाजेपर्यंत फिरून ती अंदाजे सव्वाशे रुपये कमवते आणि घरच्या कमाईत भर टाकते.

सुनीताला काम मिळालं होतं – इचलकरंजीतल्या एका खानावळीत भांडी घासायचं, त्यासाठी तिला दोन वेळचं जेवण आणि ५० रुपये मिळायचे – तेही तृतीयपंथी ही आपली ओळख लपवल्यावरच. आता छोटा काही तरी धंदा सुरू करण्यासाठी तिने एका मित्राकडून पंचवीस हजाराचं कर्ज काढलंय (तिच्या वस्तीत ओळख उघड होऊ नये म्हणून काय व्यवसाय ते उघड केलेलं नाही).

तगून राहण्यासाठी काहीही केलं तरी छळ आणि भेदभाव काही संपत नाही. “काही लोक आम्हाला दैवी समजून आमच्या पाया पडतात, पण काही मात्र भयंकर छळतात,” राधिका सांगते. “दुकानदार बऱ्याचदा आम्हाला हाकलून लावतात. पोटात चार घास जावेत म्हणून आम्ही सगळं सहन करतो. इतक्या उन्हातान्हाचं फिरून आम्हाला कसं तरी करून १५० रुपये मिळत असतील. छोट्या शहरांमध्ये देऊन लोक किती देणारेत? आम्हाला भीक मागायला आवडतंय का, पण लोक आम्हाला कामच देत नाहीत. कुठे जायचं असेल तर रिक्षावाले आम्हाला रिक्षात घेत नाहीत, बसमध्ये, रेल्वेत लोक आम्ही अस्पृश्य असल्यासारखं वागवतात आम्हाला. आमच्या शेजारी कुणी साधं बसत किंवा उभं राहत नाहीत. आम्ही भूत असल्यासारखं लोक आमच्याकडे पाहतात. रोज हा असला वनवास सहन करणं फार मुश्किल आहे. म्हणून मग आमच्या समाजाचे लोक विड्या-दारूच्या आहारी जातात.”

अनेकदा तर पोलिस मदत करायची सोडून त्यांच्या छळवणुकीत भरच घालतात. तिच्या वस्तीतली पोरं तिला त्रास देतात म्हणून शीतलने दाखल केलेल्या तक्रारीकडे त्यांनी सरळ दुर्लक्ष केलं आणि वर ते तिच्याकडे हप्ता मागतात. शीतल सांगते, जेव्हा ती पोलिस ठाण्यात गेली तेव्हा, “पोलिसांनी मला सांगितलं, ‘तूच त्या पोरांमागे गेली असशील. तुम्ही लोकच बळजबरी लोकांकडून पैसे उकळता’.” त्यात जर तृतीयपंथी धंदा करत असेल तर मग हप्त्याची रक्कम वाढत जाते, आत टाकायच्या धमक्या असतातच. “पोलिस म्हणतात, ‘तुम्हीच धंदा करता, तुम्हीच लोकांना छळता, तुम्हाला कोण त्रास देणारे’,” शीतल सांगते.

Radhika Gosavi walking through the market street on a very sunny afternoon
PHOTO • Minaj Latkar

राधिका ८०-१०० दुकानात बाजार मागते, सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत तिची १२५ रुपयांची कमाई होते

तसे आता थोडे थोडे बदल होऊ लागलेत, किमान कागदोपत्री तरी. २०१६ साली तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं आणि त्यात काही सुधारणा होण्याचा अवकाश आहे. या विधेयकाने तृतीयपंथीयांना ‘इतर’ अशी स्वतंत्र ओळख लिहिण्याचा पर्याय दिला आहे आणि अन्य कोणाही भारतीय नागरिकाला असणारे सर्व हक्क त्यांना दिले आहेत. इतर तरतुदींसोबत शासनाच्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सर्व पातळ्यांवर दोन टक्के आरक्षण आणि विशेष रोजगार केंद्र सुरू करण्याची तरतूद आहे. सोबतच तृतीयपंथीयांविषयी तिरस्काराची भाषा केल्यास शिक्षेचीही तरतूद करण्यात आलेली आहे.

इचलकरंजी नगरपालिकेने मे २०१८ मध्ये तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे (जी अजून अंमलात आलेली नाही) असं पालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत रसाळ सांगतात.

रसाळ आणि अॅड. दिलशाद मुजावर तृतीयपंथीयांना रेशन कार्ड आणि आधार कार्ड मिळावीत यासाठीही प्रयत्नशील  आहेत – आजतोवर त्यांना अशी ६० रेशन कार्ड काढण्यात यश आलं आहे. कसंय, तृतीयपंथी व्यक्ती आपलं नाव बदलतात आणि त्यांच्याकडे बहुतेक वेळा कायमचा पत्ता नसतो त्यामुळे त्यांना ओळखपत्रं मिळवण्यात खूप अडचणी येतात. आणि या ओळखपत्रांशिवाय त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.

आणि याच कारणामुळे त्यांची नेमकी संख्या किती आहे हेही समजलेलं नाही. इचलकरंजीमध्ये एचआयव्ही /एड्सविषयी जागृती आणि प्रतिबंधाचं काम करणाऱ्या मैत्री या सामाजिक संस्थेच्या सांगण्यानुसार या शहरातले २५० तृतीयपंथी त्यांच्या संस्थेच्या सेवांचा लाभ घेत आहेत.

या आणि इतरही अनेक जणांचा या दुनियेतला संघर्ष सुरूच आहे, कारण जसं अलिया म्हणते तसं, “एक माणूस म्हणून कुणीच आमच्याकडे पाहत नाही.”

तृतीयपंथीयांशी माझी भेट घडवून दिल्याबद्दल अ ड. दिलशाद मुजावर यांचे, छायाचित्रणाबद्दलच्या सूचनांसाठी संकेत जैन याचे आणि या कहाणीसाठी ज्यांनी मुलाखत द्यायची तयारी दाखवली त्या सर्वांचे मनापासून आभार.

अनुवाद - मेधा काळे

Minaj Latkar

Minaj Latkar is an independent journalist. She is doing an MA in Gender Studies at the Savitribai Phule University, Pune. This article is part of her work as an intern at PARI.

Other stories by Minaj Latkar
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale