या वर्षीच्या ८ मार्च – आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत महाराष्ट्रातल्या नांदगावच्या शाहू कांबळेंच्या काही ओव्या सादर करत आहोत. पुरुषी अत्याचारांनी पेटून उठलेल्या स्त्रीचा संताप या ओव्यांमधून व्यक्त झाला आहे

अशी पापी रे चांडाळा , माझ्या बाईला बोलला

कशी राळाच्या कणीवाणी , माझ्या नेतरी तो सलला

शाहूबाई कांबळे काळाच्या दोन दशकं पुढे होत्या असंच म्हणायला पाहिजे. सध्या लैंगिक हिंसा, अत्याचार आणि छळाच्या विरोधात जगभर जे उठाव सुरू आहेत ते पाहता तर नक्कीच. गेल्या वर्षात या प्रकारचे असंख्य गुन्हे उघडकीस आल्याने माध्यमं, मनोरंजन आणि शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. #MeToo [‘मी देखील’] चळवळीत फारशा प्रकाश झोतात नसणाऱ्या चित्रपट अभिनेत्रींनी देखील पुरुषांकडून झालेल्या छळाच्या कहाण्या जागतिक मंचावर उघडपणे मांडल्या आहेत.

शाहू कांबळेंचा मंच होता नांदगावमधलं त्यांचं घर आणि धान्य दळायचं त्याचं जातं. खेड्या-पाड्यातल्या बाईचा हा एकमेवाद्वितीय असा सांस्कृतिक अवकाश आहे. शाहूबाई (इतर विषयांसोबतच) आपल्या ओव्यांमधून हिंसा आणि छळाबद्दल गातात. २०१६ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी शाहूबाईंचं कर्करोगाने निधन झालं. तोपर्यंत पुणे जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये त्या आपल्या गाण्यांमधून हेच सारं मांडत होत्या. फक्त गावाबाहेर फारशा कुणाला त्याची कल्पनाही नव्हती इतकंच.

गेल्या वर्षात माध्यमांमधून पुढे आलेल्या छळाच्या कहाण्याच शाहूबाईंची गाण्यामधून ध्वनित होतात. सत्तास्थानांवरच्या या हिंसक भक्षकांकडून स्त्रिया, मुलं आणि अगदी पुरुषांच्या छळाच्या या कहाण्या समाजाच्या सर्व स्तरातून आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून पुढे येत आहेत. आणि बहुतेक वेळा हे भक्षक पुरुष असतात जे स्त्रियांचा शाब्दिक, शारीरिक किंवा दोन्ही तऱ्हेचा छळ करतात, हे वेगळं सांगायला नको.

इतक्यातप्रसिद्ध झालेल्या ‘युएन विमेन’च्या अहवालानुसार पन्नाशीच्या खालच्या दर पाचातल्या एका मुलीवर/स्त्रीवर गेल्या १२ महिन्याच्या काळात तिच्या जोडीदाराने हिंसा केली आहे. भारतासह, मध्य आणि दक्षिण आशियामध्ये हेच प्रमाण २३.१ टक्के आहे.

भारताच्या शहरांमध्ये आणि खेड्यापाड्यांमध्ये हा असा – किंवा याहूनही भयंकर छळ मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. शाहूबाई त्यांच्या गावातलं चित्र मांडतात, तेही संताप आणि रागाने भरलेल्या ओव्यांमधून.

युएन विमेन अहवालानुसार लिंगसमानतेच्या निर्देशांकामध्ये २०१५-१६ च्या भारताच्या आकडेवारीतून असं दिसून येतं की संपत्ती आणि राहण्याचं ठिकाण या दोन्हींचा संयुक्त परिणाम म्हणून विविध प्रकारच्या विषमतांमध्ये मोठी भर पडते. या अहवालानुसार, शहरी भागातल्या श्रीमंत मुलीच्या तुलनेत ग्रामीण, गरीब घरातल्या २०-२४ वयोगटातल्या मुलीची परिस्थिती काय आहे?

-    १८ वर्षाच्या आत लग्न होण्याची शक्यता ५.१ पटीने जास्त

-    कधीच शाळेत गेली नसण्याची शक्यता २१.८ पटीने जास्त

-    किशोरवयात आई बनण्याची शक्यता ५.८ पटीने जास्त

-    स्वतःच्या वापरासाठी हातात पैसा नसण्याची शक्यता १.३ पटीने जास्त

-    पैसा कसा खर्च केला जावा याबाबत काही ठरवू शकत नसण्याची शक्यता २.३ पटीने जास्त

यातून काय दिसतं तर स्त्रिया आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या कुटुंबातल्या पुरुषांवरच पूर्णपणे अवलंबून आहेत. आणि हे शहरांपेक्षा ग्रामीण भारतात जास्त प्रमाणात दिसून येतं. या अशा पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे काही पुरुषांना स्त्रियांवर हिंसा करण्याचं बळ मिळतं - घरात आणि घराबाहेर, कामाच्या ठिकाणी, शेतात, रस्त्यात...

बाईचं समाजातलं स्थान आणि लिंगभावाच्या मुद्द्यांवर जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहामध्ये शेकडो ओव्या आहेत. २०१७ मध्ये पारीने या संग्रहातल्या ओव्यांचा पहिला संच सादर केला , ज्यात या भव्य अशा उपक्रमाचा इतिहास आणि त्यामध्ये सामील असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली होती. पुरुषांकडून बाईचा केला जाणारा छळ, अपमान आणि हिंसा होण्याचा धोका या विषयावरच सुमारे ५०० ओव्या आहेत. आणि ही हिंसा केवळ लिंगभेदातून होत नाही, तिला जात आणि वर्गरचनेचेही पदर आहेत, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बलवानांकडून समाजातल्या कमजोर वर्गाचा छळ होण्याचे संदर्भ आहेत.

जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत आम्ही शाहू कांबळेंच्या ध्वनिमुद्रित ओव्या ऐकवित आहोत. ११ सप्टेंबर २०१७ रोजी आम्ही त्यांच्या कुटुंबियांना भेटलो – त्यांचे पती, दोन मुलं, सुना आणि नातवंडं असं त्यांचं कुटुंब. त्यांच्या नांदगावच्या घरी आम्ही त्यांची भेट घेतली. शाहूबाईंचं मात्र फक्त एक छायाचित्र घेता आलं - त्यांच्या भिंतीवरच्या फोटोचं.

PHOTO • Samyukta Shastri

संपूर्ण कुटुंब एका चौकटीत डावीकडून उजवीकडेः धाकटी सून पौर्णिमा कांबळे , मुलगा संजय , शालूबाईंची मैत्रीण कुसुम सोनवणे , थोरली सून सुरेखा , सोबत तिची मुलगी प्रतीक्षा , नातसून रजनी , शालूबाईंचे पती नामदेव आणि नातू सक्षम आणि प्रतीक

ऑक्टोबर १९९९ मध्ये जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाच्या मूळ गटाने ध्वनिमुद्रित केलेल्या या चार ओव्यांमध्ये छळ करणाऱ्या पुरुषाप्रती बाईला असणारी चीड आणि संताप जोरकसपणे व्यक्त झाला आहे.

एखाद्या पुरुषाने बाईचा छळ केला तर ती संतापते आणि त्या पुरुषाविषयी तिच्या मनात फक्त चीड निर्माण होते. शाहूबाई गातात की ती एखाद्या वाघिणीसारखी हिंस्त्र होऊ शकते, अगदी तिच्या बापासारखी जो स्वतः वाघासारखा शूर आहे. त्या मूर्ख पुरुषाचे बोल ऐकून तिच्या अंगाची लाही लाही होतीये.

ती त्याला सांगते की तुझी वासना पापाची आहे आणि शक्य तितक्या कडक शब्दात ती त्याला समज देते. यम तुला न्यायला येईल तेव्हा तुझा तू असा काही छळ करेल की तुझा अंत वेदनादायी असेल. तिने त्या पुरुषाची किती वाईट वखटी बोलणी सहन केली असतील ते तिच्या या तळतळाटातून समजून घेता येतं.

पुढच्या ओवीत शाहूबाई गातात की हा पापी चांडाळ पुरुष तिच्या लेकीला काही तरी वाईट बोलला आणि आता तर राळेच्या कणीसारखा तो तिच्या नजरेत खुपू लागलाय. तू तर पावसापाण्याने घराच्या दारात जमा झालेल्या चिखलासारखा आहेस, याहून अजून तुला काय सांगू असंही त्या पुरुषाला सुनावतात. अजून किती तऱ्हेने त्याला त्याचे दुर्गुण सांगावे असंही त्या म्हणतात.

तर, ऐका या चार ओव्याः

अशी बाजी माझ्या वाघ मी वाघाची वाघीण
कसा बोलला येडा मूरख, झाली देहाची आगीन

पापी रे चांडाळा, तुझी पापाची ती रे वासना
अशी मरणाच्या ना वेळ, तुला यमाची जाचना

अशी पापी रे चांडाळा, माझ्या बाईला बोलला
कशी राळाच्या कणीवाणी, माझ्या नेतरी तो सलला

अशी पाण्या ग पावसानी, दारी चिखल रापला
अशी येड्या तु रे मुरखा, किती देऊ तुला दाखला

aśī bājī mājhyā vāgha mī vāghācī vāghīṇa
kasā bōlalā yēḍā mūrakha jhālī dēhācī āgīna

pāpī rē cāṇḍāḷā tujhī pāpācī tī rē vāsanā
aśī maraṇācyā nā vēḷa tulā yamācī jācaṇā

aśī pāpī rē cāṇḍāḷā mājhyā bāīlā bōlalā
kaśī rāḷācyā kaṇīvāṇī mājhyā nētarī tō salalā

aśī pāṇyā ga pāvasānī dārī cikhala rāpalā
aśī yēḍyā tu rē murakhā kitī dēū tulā dākhalā

Framed photo of Shahu Kamble with garland
PHOTO • Samyukta Shastri


कलावंतः शाहू कांबळे

गावः नांदगाव

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नव बौद्ध

वयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)

मुलं: दोन मुलं, दोन मुली व्यवसायः शेती

दिनांकः या ओव्या आणि सोबतची माहिती ५ ऑक्टोबर १९९९ रोजी संकलित करण्यात आली. छायाचित्रं ११ सप्टेंबर २०११ रोजी घेण्यात आली.

पोस्टर - सिंचिता माजी

Namita Waikar is a writer, translator and Managing Editor at the People's Archive of Rural India. She is the author of the novel 'The Long March', published in 2018.

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

PARI Grindmill Songs Project Team: Asha Ogale (translation); Bernard Bel (digitisation, database design, development and maintenance); Jitendra Maid (transcription, translation assistance); Namita Waikar (project lead and curation); Rajani Khaladkar (data entry).

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale